Total Pageviews

Saturday, August 4, 2012

रक्षाबंधन!

लहानपणा पासूनच ह्या सणाचं मला खूप अप्रूप राहिलंय...कित्ती तयारी करायचे...हातानी राखी बनविण्या पासून ती तुझ्या हातावर बांधी पर्यंत...आणि मग तुझ्या कडून मिळणार गिफ्ट.. खुपदा आधीच तुला आवर्जून hint दिलेली असायची कि मला काय गिफ्ट हवंय...आणि तू द्यायचासही... अगदी वर्ष्याच्या सुरुवाती पासून पैसे जमवायचास ना... त्यासाठी... दिसा मागे दिस आणि वर्षांमागे वर्षं सरली...
आज रक्षाबंधन आहे आणि आपण दोघे दोन वेगळ्या शहरात.... दादा तुझी खूप खूप आठवण आली... गावातल्या दुकानांवर इकडे खूप लगबग होती. सासुरवाशी मुली छान नटून भावाकडे जायला निघाल्या होत्या. पोरांच्या कपाळावर टिके आणि हातावर राख्या झुलत होत्या. मी हि घेतली एक राखी तुझ्यासाठी. पण त्यात ती राखी बनाविण्याची गम्मत नव्हती...एक एक धागा निवडून तो विणताना जणू आपल्या नात्यालाच विणायचे मी...आणि एवढ सर्व करतांनाही तुझ्या आवडीचा रंग...तुझ्या आवडीची design आणि बरंच काही ध्यानी ठेवाव लागायचं...त्यासाठी पैसे जमविताना कित्ती कसरत करावी लागायची...नेमका कुठे तरी रुपयाच कमी पडायचा... तो आई हळूच गल्ल्यात टाकून द्यायची...कळत-नकळत.. आज मात्र खूप options होते...designs होते... इतके कि मलाच प्रश्न पडला होतो नेमका घेऊ काय..? मग क्षण भर डोळे मिटले आणि तूला आठवलं.. साधासा तू... अगदीच कुणाच्या नजरेत भरावास असाही नाही पण अगदीच कुणी लक्ष देणार नाही असाही नाही... शांत.. संयमी... अगदी माझ्या विरुद्ध... आणि सगळ्यात साधी...नाजूकशी राखी उचलली मी....तुला आवडेल आणि शोभेल अशी... तुझ्या सारखीच...!
आजकाल राखी चटकन पोहचावी म्हणून courier करतात...मी ही केल...आणि घरी परतायला निघाले...
सगळ्या आठवणी जाग्या झाल्या...
तुझा जन्म...तुझं बालपण.. आपले खेळ... आपली भांडण.. चर्चा.. गप्पा... आणि बरंच काही...
खेळताना कित्तीदा धडपडायचास तू...लागायचं तुला...आणि रडायचे मात्र मी...आणि वर तू डोळे पुसून मलाच म्हणायचास, 'दिदू फार नाही ग लागलय.. रडू नकोस...' आणि मला लागल्यावर मात्र तुझ्या चेहऱ्यावर चिंता घर करायची... दाखवायचा नाहीस तू पण मला माहितीये कि त्रास तुलाही व्हायचा. तुझ्या यशात कित्तीदा उर भरून आला अभिमानाने आणि माझ्या अपयशात तू नेहमीप्रमाणे पाठीशी उभा होतास मला धीर देत...कधी कधी घाईत अधाशासारखे एकाच पानात खायला बसायचो...आणि शेवटचा घास आवर्जून एकमेकांसाठी ठेवायचो... आणि तो घास तसाच रहायचा.. काहीही खाऊ मिळाला कि त्याचे दोन भाग न सांगता व्हायचे.एक तुझा आणि एक माझा... ते कित्तीही सारखे असले तरी त्यात तुला वाटला म्हणून एक मोठा भाग तू मला द्यायचास.... पपांच्या budget मध्ये आपली खरेदी adjust व्हावी म्हणून तू नेमही 'सध्या काही नको' म्हणून मला खरेदी करायला सांगायचास...आणि माझी खरेदी दुरून कौतुकाने पहायचास...आणि तुझ्या खरेदीला मात्र माझ्याशिवाय कधीच नाही जायचास... शाळेत कित्तीदा तुझी स्पर्धा माझ्याशीचं व्हायची... आपली इच्छा नसतानाही...पण तू मात्र तुझं वेगळेपण सिद्ध केलस आणि तेव्हा सर्वांत जास्त खुश मी होते. आज पपा नाही म्हणणार नाहीत पण तरी 'का उगाच खर्च?' अशी ठाम टिपणी देऊन तू माझीच scooty वापरतोय, आनंदात...!
कस जमत रे तुला नेहमी अस दुसऱ्यासाठी जगायला? माझ्या आनंदात खुश व्हायला..? माझ्या संतापात ऐकून घ्यायला..? असमाधानाची साधी रेषाही नसते त्या शांत, निर्विकार चेहऱ्यावर...
आपल नात celebrate करायला आपल्याला हा खास दिवस लागत नाही कारण ते प्रत्येक श्वासागणिक जिवंत असतं, माझ्यात आणि तुझ्यात आपल्या आठवणीमधून..पण तरी आज तुझी खूप खूप आठवण आली....
मला माहितीये तू खूप आतुरतेने वाट पाहत असणार राखीची... आणि मिळाल्या बरोबर लगेच बांधून घेशीन...नंतर मग नेहमीसारखी जपून ठेवशील तिला, तुझ्या कपाटात...
आठवणी आठवणी आणि फक्त आठवणी...डोळे पाणावलेत लिहून...आणि मला माहितीये वाचून तुझेही डोळे आत्ता भरून आलेत... हो ना?
देवा माझ्या भावाला उदंड आयुष्य दे...त्याच्या स्वप्नांना आभाळाचे पंख दे आणि प्रयत्नांना तुझ्या आशीर्वादाची जोड दे... आणि मला काही नको...

1 comment: